पगार एक हजार खरा, पण समग्र जीवनभरच !
ही गोष्ट खरी आहे. एका व्यवहारकुशल व्यापार्याकडून ती मी पुन्हा एकदा शिकलो होतो. त्या व्यापर्याला भेटायला एकदा मी त्याच्या घरी गेलो होतो. त्या वेळी टेलिव्हिजनवर एक कार्यक्रम चालू होता. ‘क्वीज प्रोग्रॅमचा.’ तो कार्यक्रम फार लोकप्रिय होता. दोन गट समोरासमोर बसतात. एका गटातील एकजण प्रश्न विचारतो. आणि समोरच्या गटातील एकजण त्याला उत्तर देतो. त्या प्रश्नाचे स्वरुप अशा प्रकारचे होते.-
‘चिनी देशाची राजधानी कोणती?’
‘भारताच्या कोणत्या गोलंदाजाने आजपर्यंत सर्वात जास्त क्रिकेटच्या खेळात बळी घेतले?’
‘आफ्रिकेतला सर्वात उंच पर्वत कोणता?’
‘रसायनशास्त्रातले सर्वात पहिले नोबल पारितोषिक कोणाला मिळाले?’
‘झांबिया देशाला कोणत्या सालात स्वातंत्र्य मिळाले?’
असे प्रश्न विचारले होते. आणि समोरच्या गटातील सदस्या त्याला उत्तर देत होते. टीव्हीवरच्या या कार्यक्रमामुळे आमच्या बोलण्यात व्यत्यय येईल म्हणून त्या व्यापार्याने टी.व्ही.बंद केला. मी त्याला म्हटले, ‘‘या कार्यक्रमात तुम्हाला रस असेल तर तुम्ही तो चालू ठेवला तरी चालेल.’’
‘‘छे छे, मला त्यात मुळीच रस नाही. तुम्हाला सांगू? त्या दोन गटांमधील कोणी व्यक्ती स्वत: हुशार आहोत असे समजून जर माझ्याकडे नोकरी मागायला आली तर मी तिला किती पगार देईन?’’
‘‘किती द्याल?’’
‘‘एक हजार रुपये, पण महिन्याचे नाही हं!’’
‘‘मग वर्षाचे हजार रुपये?‘‘ मी कुतूहलपूर्वक विचारले.
‘‘नाही वर्षाचे पण नाही, सबंध जिंदगीचे’’
मी म्हटले ‘‘तुम्ही असे का म्हणता? त्या लोकांच्या ज्ञानाला तुम्ही इतकी कमी किम्मत का देता?’’
‘‘हे काय ज्ञान आहे? क्षुल्लक गोष्टींना इकडचा तिकडचा एक एक तुकडा आहे. या गोष्टी माहीत असण्यामागे हेतू काय आहे? त्या बहुतेक गोष्टींची माहिती निरर्थक असते. एखाद्या विषयाची संपूर्ण माहिती मिळवून, तिच्यातील तपशीलाचा संबंध जोडून व त्यावर स्वतंत्र बुध्दीने विचार करुन अनुमान काढणे, याला ज्ञान म्हणता येईल. हे लोक जे किचकट प्रश्न एकमेकांसमोर टाकतात ते आणि त्याची उत्तरे मला, मी जर एक हजार रुपयांचे काही संदर्भ-ग्रंथ खरेदी केले तर त्यातूनही मिळतील. तेवढाही कदाचित मला खर्च करावा लागणार नाही. मग त्याला मी एक हजारापेक्षा जास्त पगार का म्हणून द्यायचा?
अवाक होऊन मी त्यांच्याकडे पाहात राहिलो, तेव्हा तो म्हणाला, ‘‘जास्त पगार मी देईन, पण कोणाला? माझे प्रश्न सोडविण्यास जो मला मदत करील त्याला. त्या निरर्थक माहितीचे ज्ञान कोणते कुटिलप्रश्न सोडविण्यास मदत करणार आहे ? अडचणीत टाकणारे प्रश्न सोडविण्याकरीता विचारपूर्वक, बुध्दीचा उपयोग करण्याची क्षमता पाहिजे. डोक्याला शुल्लक गोष्टींचे गोडाऊन बनविणारा मनुष्य मला काय पैसे मिळवून देणार आहे? मला पाहिजे तो नव्या नव्या कल्पना देणारा मनुष्य; केवळ हकीगती सांगणारा मनुष्य नव्हे.’’