टीकेविषयी निकोप दृष्टी कशी ठेवाल ?

Adv.Saurabh Rajput
0

 


टीकेविषयी निकोप दृष्टी कशी ठेवाल ?


लोकांच्या टीकेला भिऊन चालत नाही. तसे आपण भिऊ लागलो तर नवीन काही आपल्याला शिकता येणार नाही. आपल्या कामाची जे लोक प्रशंसा करतात त्यांचे भले आपण आभार मानावे, पण जे आपल्यातले दोष किवा चुका दाखवितात त्यांचा चांगुलपणाही आपण स्विकारला पाहिजे.


त्याकरीता लोकांच्या टीकेचे खरे स्वरुप आपण ओळखायला शिकले पाहिजे. जर आपण जीवनात उच्च शीखर गाठण्याविषयी कृतीनिश्चयी असलो, तर त्या बाबतीत दोन तीन सूचनांचा विचार करणे योग्य होईल.


१. आपल्या टीकाकारांचा आणि टीकेचा उद्देश आपण समजून घेतला पाहिजे. कोण आपल्यावर टीका करतो, आणि त्याच्या मागे कारण काय असते? कोणत्या हेतूमुळे त्याला तसे म्हणावे लागले ? एवढे समजून घेतले की, टीकेचा स्विकार करायचा, की करायचा नाही ते समजून येईल. ते समजण्याकरीता टीकेचा संदर्भ आणि आसपासची परिस्थिती यांचा अंदाज काढणे उचित होईल.


२. टीका जर वाजवी असेल तर तिचा आनंदाने स्विकार करावा. त्यात प्रतिष्ठेचा प्रश्न आणू नये. ज्या त्या गोष्टीत प्रतिष्ठेचा प्रश्न उभा करण्याने त्याचा विपरीत परिणाम आपल्यालाच भोगावा लागतो, समोरच्याला नाही. अनेक वेळा तशा वृत्तीने समोरच्याला आनंद होतो. खेदपूर्वकही तुम्ही जरी टीकेचा स्विकार कराल, तरी स्वत: सुधारण्याच्या संधीचा तुम्ही फायदा घेऊ शकाल. टीकेत थोडेफार जरी तथ्य असल्यासारखे वाटले आणि तिचा संपूर्ण आशय तुमच्या लक्षात आला नसला तरी तिच्यासंबंधी अधिक खुलासा तुम्ही मागू शकता. तसे केल्याने टीकाकार आणि तुमच्यामधले अंतर खूप कमी होते, आणि खास करुन तुमच्या वरच्या अधिकार्‍यांशी  तुमचे संबंध चांगले राहतात.


३. आपल्यावर केलेली टीका ऐकल्यावर तिच्याच अनुरोधाने जाणे जरुर नसते. शेवटी महत्त्वाचा असतो तो आपला निर्णय, आपली महत्त्वाकांक्षा. आपल्यात एक म्हण आहे, ‘ऐकावे जनाचे, करावे मनाचे.’

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)