जसे विचार, तसे फळ.
खरे पाहाल तर जगातले एक एक शोध, एक एक कृती, एक एक सर्जन या सर्वांमागे सफल होण्याची आकांक्षाच पूरक बळ म्हणून काम करीत असते. जोपर्यंत मनुष्याला वाटले, ‘पाण्यात पडलो तर मी बुडून जाईन’ तो पर्यंत त्याला पोहायला येणे शक्य झाले नाही. पण त्याने जेव्हा विचार केला की, माशाप्रमाणे तोही पाण्यात पोहू शकेल तेव्हा त्या दिवसापासून त्याने पाण्यावर तरंगण्याचे प्रयोग सुरु केले. पाच-पंचवीस वेळा अपयश आल्यावर एक दिवस तो पाण्यावर तरंगू शकला. जोपर्यंत मनुष्याला वाटले की, माणसाला पक्षाप्रमाणे आकाशात विहार करता येणार नाही. तोपर्यंत त्याला गगनात विहार करण्याचा मार्ग सापडला नाही. पण आकाशात उडण्याची त्याला चिन्हे दिसू लागली, त्या दिशेने राईट बंधूंनी सुरुवात केली आणि आकाशातील उड्डाणाच्या क्षेत्रात ते सफल झाले. जोपर्यंत मनुष्याला वाटत होते की, चंद्रावर जाता येणे शक्य नाही तोपर्यंत त्या नकारात्मक विचारामुळे त्या बाबतीत काही मार्ग सापडला नाही. पण काही वैज्ञानिकांमधे चंद्रावर पाय ठेवण्याचे महत्त्वाकांक्षा जेव्हा जन्मली तेव्हा त्या दिशेने त्यांनी कसून प्रयत्न केले. त्यांच्यातील आत्मविश्वासाने काही थोड्या सफल आणि असफल प्रयत्नांनंतर त्यांना शेवटी चंद्रावर उतरता आले. त्याचे कारण आपण ते करु शकू असा त्यांना दांडगा आत्मविश्वास होता. आज आपल्याकडे कॅन्सर बरा करण्याचे खास असे औषध नाही. पण एखादा वैज्ञानिक जेव्हा निश्चयपूर्वक असे मानील की, कॅन्सर सारख्या रोगावरही मात करता येईल, त्या वेळी कॅन्सरचा समूळ नाश करणारे औषध तो नक्कीच शोधून काढील.