मग यश तुमचेच आहे.
तुमचे लक्ष नक्की कराल, त्याच दिवसापासून ते साध्य करण्याकडे तुम्हाला वळले पाहिजे. त्याचे कारण पूर्वीच सांगितले आहे. एक एक वीट बसवूनच सबंध इमारत उभी राहते. त्याचप्रमाणे योग्य दिशेने एक एक दिवसाची कामगिरी पार पाडूनच तुमची ध्येयरुपी इमारत उभी राहते. एका एका दिवसाचा तुमचा प्रयत्न हा एक एक विटेप्रमाणे असतो. रोज रात्री स्वत:कडे तुम्ही असा हिशोब मागायचा असतो की, मी माझी महत्त्वाकांक्षा गाठण्याच्या दिशेने, आज काय कामगिरी पार पाडली? असा स्वत:कडे हिशोब मागतांना जरासुध्दा ढिलाई करता कामा नये. क्रिकेटचा खेळाडू प्रत्येक फाटक्या बरोबर धाव मिळवतो असे नाही. पण त्यात त्याचा प्रयत्न नसतो असे नाही. प्रयत्न असतो. पर प्रत्येक फटका त्याला चौकार विंâवा षट्कार मिळवून देत नाही. त्याप्रमाणेच तुमचा प्रत्येक दिवस तुमच्या महत्त्वाकांक्षेच्या दिशेने आपला हिस्सा देईलच असे नाही. काही साध्य न होता दिवस निघूनही जाईल. दोन चार प्रयत्न फुकट गेले म्हणून त्यानंतर प्रयत्न न करणे, महत्त्वाकांक्षी माणसाला मानवणार नाही. उद्या तुम्ही काय मिळवाल ते, आज तुम्ही काय कराल त्यावर अवलंबून आहे. आज पेरा, ते उद्या उगवेल. पण उगवेल की उगवणार नाही याचा विचार करीत बसणार्याने आज काहीच पेरले नाही तर त्याच्या उद्याचा दिवस आजच्यासारखा रिकामाच जाणार.
तुम्ही तुमचे ध्येय किवा लक्ष नक्की केले असेल आणि ते साध्य करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगीत असाल, तर तुमच्या मार्गात येणा-या अडचणींना तोंड कसे द्यायचे आणि त्यांच्यावर मात कशी करायची ह्यासंबंधीच्या सूचना देण्याचा या मागचा मुख्य उद्देश आहे. खात्री बाळगा की यश तुमचेच आहे, जर -
१) तुम्हाला खरोखरी महत्त्वाकांक्षा असेल तर,
२) ती पुरी करण्याची तुमच्यात धगधगती इच्छा असेल तर,
३) ती हस्तगत करण्याकरीता जे काही करावे लागेल ते करण्याकरीता तुम्ही कंबर कसाल तर सफलता तुमची, तुमचीच आहे.
ज्यांना जीवनात काही महत्त्वाकांक्षा नाही, जीवनात काही साध्य करण्याची इच्छा नाही तर आपल्या जीवनाची वर्षे घालवीत असतात, पण आपले जीवन जगत नसतात. अनेकदा ते सांगत असतात, ‘‘मला जगण्यात समाधान वाटत नाही.’’ आपण जन्मतो तो आपल्याला शाप आहे असेच ते मानतात. अशी माणसे जन्मली काय, जगली काय किवा मेली काय, सगळे सारखेच.