संधीला खेचून आणा.....
मी अजूनर्यंत कोणी असा नशीबवान मनुष्य पाहिलेला नाही, की ज्याने संधीला आणि नशीबाला आपल्याकडे खेचून आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केलेले नाहीत. अनेक लोक, संधीशी निगडित असलेल्या परिश्रमाच्या तत्त्वाला ओळखायला तयार नसतात. असे लोक शेवटच्या खुर्चीवर बसून, ‘संधी आता येईल, मग येईल’ म्हणून वाट पाहत बसतात. मनात म्हणत असतात, ‘कोणीतरी हरीचा लाल येऊन उभा राहील, आपली पारख करील आणि आपल्याला उच्चपदावर नेऊन बसवील. ज्याप्रमाणे असंख्य सिनेकलाकारांपैकी चारपाच जणांचीच नावे प्रसिध्दीच्या झोतात झळकतील त्याप्रमाणे.
पण त्या वेळी ते असा विचार करीत नाहीत की, ते कलाकार सिनेमाक्षेत्रात दाखल होतात आणि सर्वोच्च स्थान मिळवितात, ही गोष्ट दोन चार महिन्यात घडत नसते. ते यश मिळविण्याकरीता अथक प्रयत्न करावे लागतात. पूर्वी कधी समोर नव्हती अशी संधी उभी करायला वर्षनुवर्षे तप करावे लागते.
आमच्या एका मित्राला त्याच्या ऑफिसच्या कामास रस वाटत नव्हता. त्यामुळे त्याला अनुकूल वाटे, अशा ठिकाणी नोकरीकरीता तो अर्ज करी. पण सगळीकडून त्याला नकारच येई. त्यामुळे सदा तो, ‘मला अनुकूल संधी मिळतच नाही.’ असे रडगाणे गात बसे.
पण खरी गोष्ट अशी होती की, ज्या ठिकाणी ती नोकरी करीत होता त्या बाबतीत कोणी त्याला विचारले तर तो म्हणे, ‘‘या नोकरीत ईर्षा वाटण्यासारखे काहीच नाही. नोकरीत काही दम नाही.’ पण स्वत: काहीच करीत नसे. ते पाहिल्यावर त्याच्या एका मित्राने त्याला त्याच्या कामासंबंधी अधिक माहिती विचारली, आणि म्हणाला, ‘‘हे पहा, तू आहेस त्याच ठिकाणी आपली हुशारी दाखव ना? पडकारुस आणि इर्षेने करण्यासारखे तुझ्या ऑफिसमध्ये जे काम असेल ते घे आणि करुन दाखव.’’
पण अधिक किवा जबाबदारीची कामे अंगावर घेण्याची त्याची मुळातच वृत्ती नव्हती. त्याला अशीही भीती वाटे की, आपल्या अकार्यक्षमतेमुळे दुसर्याला आपले काम पसंत पडले नाही तर ? त्यामुळे दुसरीकडे तो जेव्हा अर्ज करी तेव्हा नव्या जबाबदारीच्या भीतीने त्याला असेही वाटे की, आपल्या अर्जाला नकार मिळाला तर बरे. त्यामुळे आपल्या अर्जातही काही चैतन्य तो दाखवू शकत नव्हता. शेवटी त्याच्या इच्छेप्रमाणे व्हायचे. त्याला स्वत:लाच जिथे आत्मविश्वास नव्हता, तिथे दुसर्याला तरी त्याच्या कामाविषयी विश्वास कसा वाटावा ? आणि त्याने त्याला संधीचा लाभ मिळवून द्यावा ?
जे लोक तक्रार करतात की, त्यांना संधी मिळत नाही, ‘त्यांनी स्वत:ला उद्देशून असा प्रश्न विचारावा, ‘जी संधी मला मिळावीशी वाटते ती मिळविण्याकरीता मी काय प्रयत्न करतो ? ‘ मनुष्य हातातील कामगिरी जर कुशलतेने पार पाडील आणि दुसर्यांच्या नजरेत भरेल अशा रीतीने काम करण्याचा प्रयत्न करील तर नशीब त्याच्यापासून कधी दूर राहणार नाही. ज्या संधीच्या शोधात तो असतो ती त्याला सापडतेच. पण जीवन परिवर्तनाच्या महान दिवसाची जो नुसती वाटच बघत बसतो त्याच्या आयुष्यात तो दिवस कधीच उजाडत नाही.
इंग्लंडमधील एका चित्रकाराची गोष्ट मला आठवते. काही वर्षांपूर्वी मी ती गोष्ट वाचली होती. मला त्या चित्रकाराचे नांव आठवत नाही. त्याच्या हातापायांत संधिवात झाला होता. कित्येक वेळा त्याला अंथरुणात पडून रहावे लागे. पण चित्रकार होण्याची त्याला मोठी हौस. पण सर्वसाधारण मनुष्याप्रमाणे बोटांत ब्रश पकडू शकेल अशी त्याची स्थिती नव्हती. त्यामुळे मुठीत ब्रश पकडून चित्रे काढण्याचा त्याने हळूहळू सराव केला. स्वत:च्या कल्पनेने त्याने पुâलांची सुंदर चित्रे काढली. त्याची कित्येक चित्रे बक्षिसपात्र ठरली होती. केवळ स्वत:च्या मनोबळाने आपल्या शारिरीक उणिवेला त्याने शुल्लक मानले. आपली हकीगत सांगतांना तो म्हणाला, ‘‘अर्थात, माझ्या शारिरीक उणिवेमुळे अनेक गोष्टी मी करु शकत नाही, पण त्याचा अर्थ असा नाही की, ज्या गोष्टी मी करु शकतो त्या नाकारण्याकरीता मी काहीतरी बहाणा काढावा. तुम्हांला वाटेल की, अमुक अमुक गोष्ट माझ्या हातून होण्यासारखी नाही. पण तुम्हाला करता येण्यासारखे नाही. पण तुम्हाला करता येण्यासारखे असेल ते करी कराल की नाही? तेवढे जरी मनुष्य करील तरी स्वत:ची दया करण्याची त्याच्यावर पाळी येणार नाही.’’
चित्रकाराच्या त्या दृष्टिकोनातून अनेकांना प्रेरणा मिळू शकेल. बर्याच गोष्टी करणे आपल्या शक्तीबाहेर असेल, पण जे करता येईल ते करण्यात आपल्याला कोण अटकावील? ते करण्याकरीता संधीच्या दिवसाची वाट पाहत आपण बसलो तर आपल्या परिस्थितीत कसली सुधारणा होणार आहे ? बहुसंख्य लोक आपल्या प्रगतीच्या आड येऊ शकतील अशा गोष्टी शोधण्यातच आपला वेळ आणि शक्ती खर्च करतात. खरी गोष्ट अशी असते की, आपल्यात जे काही असते त्याच्या सहाय्याने आपण विकासाची सुरुवात केली पाहिजे. अशा गोष्टी मनात हेवा उत्पन्न करण्याशिवाय दुसरे काही करीत नाहीत. अगदी हलाखीच्या दशेतून जीवनाच्या शिखरावर पोहोचलेल्या व्यक्तींचे जीवनचरित्र आपण वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येते की, ज्यांना मोठमोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागले, त्यांनीच जीवनात काहीतरी मोठे साध्य केले आहे. जीवनात त्यांनी सर्वांपेक्षा अधिक संघर्षांना तोंड दिले आहे. संघर्षाशिवाय सिध्दी मिळत नसते. तशी मिळाल्यासारखी वाटली तरी त्याला कोणी सिध्दी मानीत नाहीत. पण संघर्षाला भिऊन ते जर संधीची वाट बघत राहिले असते, तर आज ते कोणाच्या स्मरणात राहिले असते? मिल्टन मिल्टन झाला, हेलन किलर झाली, बिथोवेन झाला, त्याचे कारण काहीतरी चमत्कार होऊन आपले आपोआप काहीतरी चांगले होईल अशी वाट पाहण्याऐवजी, अनेक अडचणी सोसूनही स्वत:ला जे शक्य झाले ते सर्व करण्याचा त्यांनी चंग बांधला. त्यानंतर त्यांना उच्च पदावर चढण्याकरीता कोणत्याही संधीची वाट पाहण्याची गरज पडली नाही.


