बहाणा शोधण्याच्या वृत्तीपासून दूर राहा

Adv.Saurabh Rajput
0



बहाणा शोधण्याच्या वृत्तीपासून दूर राहा


आपण वाटेल तेवढे बुध्दीशाली असू किवा  विशिष्ट नैपुण्य मिळविण्याकरीता कितीही कष्ट घेतलेले असू पण काही ना काही चूक आपल्या सर्वांकडून होत असते. अपरिपक्व बुध्दीचा मनुष्य तिच्याकडे एका दृष्टिकोनातून पाहतो तर परिपक्व बुध्दीचा मनुष्य दुसर्‍या दृष्टीने पाहतो. अपरिपक्व बुध्दीची व्यक्ती प्रत्येक बाबतीत दुसर्‍याची उणीव शोधून काढते, ‘त्यात माझी चूक नव्हती‘, ‘मला त्याची काहीच माहिती नव्हती’, वगैरे. पण पक्व बुध्दीची व्यक्ती म्हणते, ‘या चुकीत माझीही काही जबाबदारी आहे.‘ ‘यापुढे अशा तर्‍हेची चूक माझ्या हातून होणार नाही.’


‘यात माझा काही दोष नाही’ असे म्हणून जो मुनष्य स्वत:च्या जबाबदारीतून निसटू पाहतो तो पुन्हा तीच चूक करीत असतो आणि नंतरही तिचा दोष दुसर्‍याच्या डोक्यावर टाकून स्वत:ला निर्दोष मानीत असतो. पण वस्तुत: मनात तो दु:खीच असतो. प्रत्येक चुकीच्या वेळेला परिस्थिती स्वत:च्या काबूबाहेर असलेलीच त्याला दिसते, आणि नवे नवे बहाणे काढण्याकडे त्याची प्रवृत्ती होते.


चूक झाली तरी त्याबद्दल शरम वाटण्याचे काहीच कारण नसते. कोणीही मनुष्य शंभर टक्के दोषरहित नसतो. प्रत्येक जण आपल्या कुवतीप्रमाणे आणि शक्तीप्रमाणे काम करीत असतो. आणि स्वत:च्या चुकांतून तो जर काही शिकला तर स्वत:च्या ज्ञानात तो नक्कीच भर घालीत असतो. त्याच्या समजशक्तीत वाढ होते. त्यानंतरचे त्याचे निर्णय दोषरहित आणि अचूक असण्याचा बराच संभव असतो. पण जेव्हा मनुष्य स्वत:च्या चुकांतून काही शिकण्याचे सोडून देतो तेव्हा त्याच्या कपाळी निष्फलताच लिहिलेली असते हे नक्कीच.


लक्षात ठेवा, चुका दोन जण करीत नसतात. एक भगवान आणि दुसरा मुडदा. या दोघांच्या वर्गात आपण मोडत नाही. आपण भगवान नसतो आणि मुडदाही नसतो. सारांश, लहान, मोठे सर्वच केव्हा ना केव्हा तरी चुका करीत असतातच. चुकांचे प्रकार निरनिराळे असणार. मोठे लोक मोठे निर्णय घेतात आणि त्यामुळे त्यांच्या चुकाही मोठ्याच असतात. लहान माणसे लहान निर्णय घेतात तेव्हा अर्थातच त्यांच्या चुका लहान असतात. चुका कशाही असल्या तरी त्यांना भिण्याचे कारणच काय ? मोठी कंपनी मिळविते तो फायदा लाखो रुपयांचा असतो आणि तिला खोट आली तर तीही लाखो रुपयांची असते. लहान दुकान हजारांचा नफा करीत असेल तर तीही खोटही हजारांचीच असणार. पण लाखांची खोट येईल या भीतीने एखादी लिमिटेड कंपनी आपला उद्योगच जर सोडून देईल लाखो रुपयांचा नफा तिच्या दृष्टीस तरी पडेल का ?

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)