निष्फळतेचे रवंथ करु नका
अर्थात, जन्मत:च मनुष्यात आत्मश्रध्दा असत नाही. स्वत: ती निर्माण करावी लागते. हे खरे की, एकामागून एक मिळणारी सफलता आपल्यात आत्मविश्वास अनेक पटींनी वाढविते. त्याचप्रमाणे एकामागून एक अपयश मिळाल्याने आत्मविश्वास खचून जातो. दुस-या शब्दांत सांगायचे म्हणजे, भूतकाळात घडलेल्या गोष्टींच्या आधाराने आत्मविश्वासाचे पोषण तरी होते किवा तो मृतप्राय होतो.
दुसरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या जीवनात घडणार्या प्रसंगांकडे आपण कोणत्या दृष्टीने पाहतो त्यावरुन आपले वर्तन घडत असते. सतत निष्फळतेचे रवंथ करण्यात काही फायदा नसतो. उलट त्यामुळे आपले नुकसान होते. त्याची गंभीरता सहजपणे आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे आपण अधिकाधिक नुकसानीच्या खाईत लोटले जातो.
त्याचे एक साधे उदाहरण आपण घेऊ - ‘अ’ आणि ‘ब’ नावाच्या दोन व्यक्ती आहेत. दोघांनाही आपल्या वत्तृâत्वशक्ती वाढविण्याची हौस आहे. तशा संधीची ते दोघेही वाट पाहत असतात. आपण असे समजून चालू की त्यांनी केलेले बोलण्याचे पहिले प्रयत्न निष्फळ झाले आहेत. ‘अ’ला वाटते की, लोकांसमोर बोलणे कठीण असते. त्यामुळे त्याला बोलण्याची दुसरी जी संधी मिळाली तरी, आज नाही, पर पुढच्या वेळेला बोलायला मी उभा राहीन’ असे म्हणून बोलण्याचा प्रयत्न करायची आलेली संधी तो गमावून बसतो. तिसर्या वेळेला पुन्हा जरी संधी मिळाली तरी ‘नाही, नाही. आज मला बरोबर वाटत नाही.’ असाच तो विचार करतो आणि बोलायचे टाळतो. या रीतीने आपली एक निष्फळता विसरुन जायची त्याची तयारी नसते. ती तो विसरु शकत नाही. त्यामुळे स्वत:च्या मनाची हौस तो हळूहळू मारुन टाकतो. पर ‘ब’ या बाबतीत अगदी निराळाच विचार करतो. ‘लहान मूल जेव्हा चालायला शिकते तेव्हा ते आपल्या पहिल्याच प्रयत्नाबरोबर एकदम चालायला लागते असे कधी होत नाही. दहा पंधरा वेळा पडल्याशिवाय कोणते मूल चालायला शिकते ? एकदाच पडल्यावर चालायचे काम फार कठीण आहे असे मानून चालायचा दुसरा प्रयत्न मुलाने केला नाही तर काय होईल ? आपल्या आयुष्यात ते मूल कधी चालू शकेल का? त्यामुळे बोलण्याची दुस-यांदा आलेली संधी तो वाया जाऊ देत नाही आणि बोलण्याच्या प्रयत्नात सुरुवातीला आलेले अपयश तो मनातून काढून टाकतो. त्या बाबतीत ‘त्यात काय मोठे बिघडले?’ असा सौम्य दृष्टिकोन तो घेतो. त्याशिवाय पहिल्या वेळी आपल्याला अपयश का आले ते शोधून काढण्याचा तो प्रयत्न करतो. आपली हिंमत वाढवतो. दुसर्या वेळी बोलतांना अनुभवाला आलेली उणीव तो तिसर्या प्रसंगी टाळण्याचा प्रयत्न करतो. दुसर्या प्रयत्नाच्या वेळी तो चार पाच वाक्ये जरी चांगल्या तरहेणे बोलू शकला तरी त्या गोष्टीचा तो बोलण्याचा आपला पहिला यशस्वी प्रयत्न म्हणून स्विकार करतो आणि आपल्या या यशाचा तो सतत विचार असतो. अशा तर्हेने उत्तरोत्तर थोडी थोडी सफलता मिळविल्यावर आपल्या बोलण्याच्या हौसेचे मूर्तस्वरुप तो पाहू शकतो. पण त्या दरम्यान ‘अ’ ने बिचार्याने मनात ठरविलेले, असते की, लोकांत बोलायचे काम फार कठीण आहे, आणि त्याला ते जमेल असे वाटत नाही. उगाच फां फां मारण्यात अर्थ नाही असे त्याला वाटते. ‘अ’ आणि ‘ब’ दोघांची शक्ती आणि क्षमता सारखी असली तरी ‘अ’च्या तशा प्रकारच्या विचाराने तो काय साधू शकणार? त्याची इतर क्षेत्रांतही तीच गत होणार. पण ‘ब’ मात्र आपल्या विधायक विचारसरणीने दुसर्या क्षेत्रात सफल झाला तर त्यात काही नवल नाही.
मानवाच्या सफलतेला केवळ श्रध्दाच एक कारणीभूत असते असे नाही. तरीपण ती त्यात फार मोठा भाग बजावीत असते. त्या करीता आत्मविश्वास कसा वाढवायचा त्या संबंधीची क्लुप्ती आपण शिकून घेतली पाहिजे. हे नक्कीच की, ज्याची स्वत:च्या कामावर विंâवा स्वत:च्या शक्तीवर श्रध्दा नसते त्याच्या हातून काहीच होत नसते. श्रध्दाहीन मनुष्य हातात काठी नसलेल्या लंगड्या माणसासारखा असतो.