‘ईश्वराने त्याला खूपच बुध्दी दिली आहे. तेवढी बुध्दी त्याने मला दिली असती तर मी सुध्दा काहीतरी करुन दाखविले असते.’
अनेक वेळा असे उद्गार ऐकायला मिळतात. अर्थात जाहीरपणे ते कोणाला तसे सांगत नाहीत. मनातल्या मनात अनेक लोक वरील किवा अशाच तर्हेने निराळे उद्गार वारंवार काढीत असतात. अशा तर्हेचे उद्गार किवा विचार मनुष्याच्या अहंभावाला घातक असतात. तसे म्हणून स्वत:च्या सफलतेकरीता केलेल्या अर्धवट प्रयत्नावर ते पांघरुण घालीत असतात. तसे उघडपणे सांगणे त्यांना पसंत नसते. त्यामुळे ती त्यांची विचारसारणी किती चुकीची आहे ते दुसर्यांकडून जाणून घेण्याची संधी त्यांना मिळत नाही. मनुष्याला दुसरा कोणी असे म्हणाला, ‘तुझी बुध्दी फार कोती आहे’ तर तो अवमान त्याला सहन होत नाही. आणि शक्य झाले तर लगेच उत्तर करतो, ‘तुझ्यात किती बुध्दी आहे ते मला माहीत आहे.’ आणि बुध्दीच्या बाबतीत आपण कोणापेक्षाही कमी नाही अशा अर्थाचे काही सांगता आले तर ते सांगण्याची संधी तो सोडत नाही.
खेदाची गोष्ट अशी की, शंभरापैकी पंचाण्णव माणसे कोणत्या ना कोणत्या प्रकारे ‘मला बुध्दी देण्यात ईश्वराने कंजूशपणा दाखविला आहे.’ असे गाणे गात असतात. आणि सगळ्यांना मोठे दु:ख हे की, सुरुवातीला ते असाही विचार करतात, ‘अगदी तसेच काही नाही,’ पण स्वत:तील सफलतेच्या अभावाचा विचार जेव्हा त्यांच्या मनात येतो तेव्हा त्यावर पांघरुण घालण्याकरीता तशा विचाराचा ते आश्रय घेतात. ‘आपण काहीच का करु शकलो नाही?’ त्याचे कारण त्यांना सापडत नाही. पण त्याबद्दल दोष कोणाला द्यायचा? अर्थात स्वत:चा दोष नियतीच्या डोक्यावर फोडतात.
बुध्दी ही मनुष्याला निसर्गाने जन्मत: दिलेली असते, त्यामुळे तिच्याबद्दल ईश्वराला जबाबदार धरुन आपल्या सफलतेच्या स्वत:च्या जबाबदारीतून मुक्त होण्याकडे मनुष्याची प्रवृत्ती असते. पण तोच तो विचार मनुष्य जर वरचेवर करीत राहील तर लहानसे बी म्हणून रुजलेल्या त्या विचाराचे पुढे मोठ्या झाडात रुपांतर होईल. पुन्हा पुन्हा केलेला विचार खतपाण्याची गरज भागवितो. सुरुवातीला जी गोष्ट खोटी, अगदी खोटी वाटत असते, ती गोष्ट, त्याचे मन कालांतराने एक सत्य म्हणून स्विकार करीत जाते. आणि तसे झाले की, बुध्दिमान व्यक्तीही शेवटी मंदबुध्दीची ठरते. तेव्हा, तसा विचार तुमच्या मनात घर करणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते.
बुध्दीच्या बाबतीत दोन मोठ्या गोष्टी आपल्याला आढळतात.
१) आपण स्वत:च्या बुध्दीला कमी लेखत असतो.
२) दुसर्याच्या बुध्दीला आपण जास्त किमत देत असतो.
याच चुकीच्या गणनेमुळे आपण स्वत:ला चुकीच्या मापाने मोजत असतो. स्वत:च्या बुध्दीकरीता खूप लांब पट्टी वापरुन तिला आपण कमी मापाची म्हणत असतो; दुसर्याची बुध्दी मापतांना आपण लहान पट्टी वापरतो, त्यामुळे ती मोठी वाटून तिच्याबद्दल आपल्याला आश्चर्य वाटते.