जीवनात सफल होणे हा एक अद्भुत अनुभव आहे. सफलता तुम्हांला काय देऊ शकत नाही? रहायला सुंदर घर, रोमांचक प्रवास, आर्थिक समृध्दी तुमच्या कुटुंबाकरिता अनेक सुखसोयी, मुलांना उत्तम शिक्षण, समाजात प्रतिष्ठा लोकांकडून आदर, आणि बरेच काही. सफलतेमुळे तुम्ही स्वत: गौरव अनुभविता. तुमचे जीवन तुम्हांला धन्य वाटते. त्यामुळे तुम्ही इतरांनाही सहाय्यभूत होता. किती अद्भुत अनुभव हा! आणि त्यामुळे असंख्य लोक सफलतेची सतत इच्छा धरीत असतात. जीवनात स्वत: निश्चित केलेल्या ध्येयाच्या शिखरावर पोहोचण्याची त्यांची इच्छा असते. तसे झाले की, त्यांना आपल्या जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटते. पण प्रत्यक्षात सफलता फार थोड्या लोकांना मिळते. शंभर टक्के लोक तिची इच्छा धरतात, पण ती मिळते फक्त पाच - सात लोकांनाच. असे का? त्याचे कारण असे की, त्या पाच-सात जणांना सफल होण्याची तीव्र इच्छा असते. त्याबरोबर त्यांच्याकडे सफलता हस्तगत करण्याकरीता लागणारे तीव्र मनोबळही असते, आणि त्याला महत्त्वाकांक्षेची जोड असते. बाकीचे मात्र फक्त इच्छाच करतात, फक्त इच्छाच, दुसरे काही नाही. पूर्वी म्हटल्याप्रमाणे त्यांच्यापैकी बहुतेकजण काही चमत्कार घडून आपली इच्छा आपोआप पुरी होईल म्हणून वाट पाहत असतात. आज नाही उद्या, असा एखादा चमत्कार घडून येईल असे त्यांना वाटत असते. त्याची वाट पाहण्यात त्यांच्या जीवनाचा मोठा भाग व्यतीत होत असतो. जेव्हा पाच-सात माणसेच जीवनाच्या शिखरावर पोहोचलेली ते पाहतात, तेव्हा ‘ते नशीबवान आहेत, नशीबवान!’ असे मानून स्वत:च्या निष्फळतेचा पांगळा बचाव ते करीत असतात. पण सफल माणसे सफल कशी होतात ते जाणून घ्यायचा ते प्रयत्न करीत नाहीत; आणि थोडाफार तसा प्रयत्न केला तरी ते बुवा त्यांना जमते, आपल्याच्याने ते कधी होणार नाही अशीच स्वत:ची समजूत करुन घेतात.
‘सफल व्हायचे आहे ना? तर मग नेहमी सफलतेचाच विचार करा’
नोव्हेंबर १२, २०२३
0