भीती घालविण्याचा उपाय शोधा
एकदा एक व्यापारी खूप चिंताग्रस्त होता. त्याच वेळी त्याचा एक मित्र त्याला भेटायला आला. मित्राने त्याला त्याच्या चिंतेचे कारण विचारले. प्रथम, कारण सांगण्यास त्या व्यापर्याने आढेवेढे घेतले. पण नंतर तो म्हणाला, ‘गेल्या तीन वर्षांपासून माझ्या धंद्यातली विक्री घटली आहे. त्यामुळे पुढे काय होणार त्याची मला काळजी वाटते. त्या काळजीतून माझी सुटकाच होत नाही. मला वाटते हा धंदा मला बंद करावा लागणार.
त्याच्या मित्राने बर्याच निष्फलतेनंतर सफलतेचा अनुभव घेतला होता. त्याने थोडा विचार केला आणि म्हणाला, ‘‘चला मी तुम्हाला मदत करतो.’’
‘‘पण माझ्या धंद्यातली तुम्हाला काही माहिती नाही, तुम्हाला काय समजणार?’’
‘‘ही गोष्ट खरी आहे की तुमच्या धंद्याची मला तितकी चांगली माहिती नाही. पण स्वत:च्या धंद्याची तुम्ही आशा सोडलीत, त्यामुळे धंद्यात नवजीवन कसे आणायचे ते तुम्हांला सुचत नाही. मला शक्य असतील तितक्या गोष्टी मी तुम्हाला सुचवीन. त्यातील उपयोगी वाटतील त्या गोष्टी तुम्ही अमलात आणा. काही वेळेला एखादी साधी गोष्ट धंद्याचा नूर बदलून टाकते.’’
‘‘असं? पण अशा एका सूचनेने काय होणार आहे? सबंध धंदाच बसायची पाळी आली असतांना आता माझा कोणत्याच गोष्टीवर विश्वास बसत नाही.’’
‘‘ते सुध्दा मला मान्य आहे. पण तुम्ही नकारात्मक दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहता म्हणून तुम्हांला तसे वाटते. पण दुसर्या तर्हेने विचार का करीता नाही ? आज मनुष्याला नवीन धंदा सुरु करायचा असेल तर एकीएक पासून सुरुवात करावी लागते. प्रथम दुकान विंâवा ऑफिसची जागा मिळवावी लागते. माल खरेदी करावा लागतो. आजकाल कोणी उधार देत नाही त्यामुळे मोठे भांडवल उभारुन पैसे रोख देऊन माल खरेदी करावा लागतो. धंदा नवीन असल्यामुळे त्याच्याकडे खरेदी करायला फारसे कोणी येत नाही, त्यामुळे समजावून आणि आर्जवून काम करुन घ्यावे लागते. अनेक वेळा दुसर्या व्यापार्या पेक्षा अधिक सवलत देऊन माल विकावा लागतो. माल उधार द्यावा लागतो आणि पैसे वसूल करण्याकरीता खूप खस्ता खाव्या लागतात. तुमच्याकडे सध्या मोक्याच्या जागेवर असलेले दुकान आहे, दुकानात माल भरलेला आहे, गिराईकांची ये - जा आहे. अशा परिस्थितीत नवा धंदा सुरु करण्यापेक्षा तुमच्याकडे जे आहे त्याचा उपयोग करुन पुढे जाणे किती सुलभ आहे याचा विचार करा.’’
हे ऐकल्यावर तो व्यापारी थोडा विचारात पडला. मग त्याच्या मित्राने त्याला असा सल्ला दिला ‘‘तुमच्या मनात जी भीती आहे - धंदा न चालण्याची - ती एकाच मार्गाने दूर होऊ शकते, त्या बाबतीत विचार केल्यावर मला जे सुचते ते हे, तुमची विक्री कमी झाली आहे त्याला काहीतरी कारण असलेच पाहिजे. ते कारण शोधून काढण्याचा प्रयत्न करा. कदाचित, कमी उठावाचा माल तुमच्या दुकानात जास्त असेल. तसे असेल तर ‘सेल’ पुकारुन थोड्या कमी भावात तो काढून टाका. त्यामुळे तुमचा मालही खपेल आणि हातात पैसाही येईल. यात कदाचित पाच दहा टक्के खोटही येईल. थोडे नवे भांडवल उभारावे लागेल. त्या नव्या पैशातून अधिक मागणी असलेला माल खरेदी करुन गाडा पुढे चालवा. जलद विक्रीकरीता काही नवी क्लुप्ती सुचत असेल तर त्यावर विचार करा.
‘‘अर्थात तुमच्या लाईनमध्ये मी नसल्यामुळे अचूक अंदाज करणे शक्य होणार नाही. ज्यांच्याशी तुमचा संबंध आहे, अशा तुमच्याच क्षेत्रातल्या एक दोन सफल व्यक्तींशी तुम्ही संपर्वâ का साधू नये? कोणाकडे आपला सल्ला मागितला तर त्याला ते आवडतेच. अर्थात त्याचा सर्वच सल्ला तुमच्या उपयोगी पडेल असे नाही. पण त्यांच्याशी केलेल्या गोष्टींतून काहीतरी उपयुक्त असे निष्पन्न होण्याचा संभव राहील. तशा प्रकारे प्रयत्न केलात तर तुमच्या धंद्यात नक्कीच सुधारणा घडवून आणता येईल. विक्री वाढविण्याची तुमची स्वत:ची ईर्षा असेल तर तुमच्या नोकरीतल्या माणसांचाही त्या दिशेने प्रयत्न राहील. तसेच वाटले तर तुमच्या मदतनीसांपैकी एखाद्या कुशल माणसाशीही सल्ला मसलत करुन पहा.
‘‘सध्याचा धंदा सरकारचा कायदा किवा अनिवार्य कारणामुळे चालविणे मुश्कील असेल तर, दुसरा कोणता धंदा करता येणे शक्य असेल तर त्याचाही विचार करा आणि त्याबरोबर त्याचीही तयारी करा. पण मला वाटते की, तुम्हाला धंदा बदलावा लागणार नाही. पण तुमच्या हितेच्छुंपैकी कोणी सफल आणि समृध्द झालेला असेल तर तुमच्या धंद्यापेक्षा थोडी निराळी एखादी लाइन तो दाखवून देऊ शकेल. तुमचा धंदा जर पुन्हा सावरण्यासारखा नसेल तर त्या बाबतीत एक मित्र म्हणून मी या सूचना करतो. पण तुम्ही एखाद्या डुबणा-या माणसाप्रमाणे वागू नये. तुम्ही पूर्वीप्रमाणेच ताकदवान आणि उत्साही आहात असेच आसपासच्या लोकांना वाटले पाहिजे.’’
या सर्व गोष्टीत महत्त्वाचा मुद्दा एकच आहे. मनातली भीती वाढू देऊ नका. भीतीने केवळ स्वस्थ बसण्यापेक्षा योग्य दिशेने काहीतरी पावले उचला. एकामागून एक पावले उचलीत गेलात तर मनातली तुमची भीती ओसरुन जाईल. पण केवळ शंकाच काढीत बसाल तर तुमच्या इच्छेपेक्षा निराळेच काहीतरी घडून येण्याचा संभव राहील.
एका सुप्रसिध्द लेखकाने म्हटले आहे, ‘ज्याला निर्णय घ्यायचा आहे तो तीन मिनिटांतच निर्णय घेतो, पण ज्याला निर्णय घ्यायचाच नाही त्याला तीन वर्षेही अपुरी पडतात’ हीच गोष्ट भय घालविण्याकरीता काहीतरी पावले उचलण्याच्या संदर्भात सांगता येईल.