‘सध्याची माझी परिस्थिती माझ्या आड येते. ती सुधारु लागली तर सर्व ठीक होईल!’
एकदा एक तरुण एका सफल उद्योगपतीला भेटला. बोलता बोलता त्याने उद्योगपतीला त्याच्या सफलतेचे रहस्य विचारले.
तो उद्योगपती त्याला म्हणाला, ‘‘काल तुम्ही कुठे होता (किवा कोण होता) ते अगत्याचे नाही. तसेच आज तुम्ही कोठे आहात, तेही अगत्याचे नाही. पण उद्या तुम्ही कोठे जाऊ इच्छिता ते अति महत्त्वाचे आहे.’’
अमेरिकेतील अॅण्ड्र्यू कार्नेगी या अब्जाधिशाचे नाव सर्वांना माहीत आहे. आपल्या जीवनात त्याने जे साध्य केले ते त्या जमान्यात कोणीही व्यक्ती साध्य करु शकली नव्हती. त्याचे वडील विणकर होते. आई लोकांचे कपडे धुऊन संसारात मदत करीत होती. दोन खोल्यांच्या घरात ते राहात होते. त्यापैकी एका खोलीत शाळा होती, आणि दुसर्या खोलीत त्यांचा संसार होता.
लहानसा अॅण्ड्र्यू त्या वेळी आठ नऊ वर्षांचा असेल. त्या वेळी त्याचा एकच शर्ट होता. रोज रात्री तो, तो शर्ट धूत असे आणि रात्री वाळल्यावर दुसर्या दिवशी तोच शर्ट तो वापरी.
आपल्या या कंगाल परिस्थितीचे अॅण्ड्र्यूला फार दु:ख होईल. या गोष्टीवर तो सतत विचार करी आणि आईला म्हणे, ‘‘आज लोकांचे कपडे धुऊन तू आपली सर्वांची गुजराण करतेस. पर लक्षात ठेव की, एक दिवस मी खूप पैसा मिळवणार आहे. त्या वेळी तुला अशी मजूरी करावी लागणार नाही. तुझ्याकरीता रेशमी कपडे, नोकर-चाकर, घोडागाडी वगैरे सर्व मी मिळवीन.’’
आपल्या आईला हे तो बोलला ते केवळ वरवरचे किवा काहीतरी बोलायचे म्हणून तो बोलला नव्हता. त्यामागे त्याची धगधगती महत्त्वाकांक्षा होती. त्या महत्त्वाकांक्षेच्या जोरावर त्याने आपले स्वप्न साकार केले. अॅण्ड्र्यू जेव्हा आपल्या आईला तसे बोलला त्या वेळी तो ‘आज’ कुठे होता ते महत्त्वाचे नव्हते. ‘उद्या’ तो कोठे जायला मागतो ते महत्त्वाचे होते.
अनेक लोक म्हणतात, ‘‘महत्त्वाकांक्षा आम्हालाही आहे, पर ती फळाला येत नाही. मार्गात आमचे कमनशीब आडवे येते. दुसर्यांना जसा संधीचा लाभ मिळतो तसा आम्हाला मिळाला असता तर आम्ही सुध्दा आमची महात्त्वाकांक्षा पुरी करु शकलो असतो.
पण हे खरे आहे का ?
जीवनात ज्यांनी सफलता मिळविली आहे त्यांच्या संबंधीची पूर्ण माहिती आपल्याला नसते. त्यामुळे दुसर्यांच्या परिस्थितीशी आपल्या परिस्थितीची तुलना करुन महत्त्वाकांक्षा लुळी पाडायला आपण काहीतरी कारण शोधीत असतो.
सफल व्यक्तींची तुम्हांला खरीखुरी माहिती मिळाली तर एक गोष्ट तुम्हांला स्पष्टपणे समजेल की, तुम्हांला जो मिळतो त्यापेक्षा अधिक चांगल्या संधीचा लाभ त्यांना मिळालेला नसतो.