दोन मोठ्या गैरसमजुती

Adv.Saurabh Rajput
0

 


दोन मोठ्या गैरसमजुती

अशा विचारांचा असफलतेत फार मोठा भाग असतो. कोणते काम करायला कोणते वय योग्य यासंबंधी काही नियम नाही. पण कोणतेही काम अंगावर पडले, किवा  कोणतीही जबाबदारी पार पाडण्याची वेळ आली की, दोन प्रकारचे विचार सफलतेच्या आड येतात.

 १) ‘ही जबाबदारी घ्यायला अजून माझे वय लहान आहे.’

 २) ‘हे काम करण्याचे माझे वय केव्हाच निघून गेले.’ 


या दोहोंपैकी कोणताही विचार मनुष्याला प्रगती करु देत नाही. त्यामुळे तो ज्या स्थानावर असतो त्या ठिकाणीच तो कायम राहतो. मग तो आपल्या मनाचे समाधान करतो, ‘ठीक आहे, दहा वर्षांपूर्वी जर माझ्याकडे हे काम आले असते तर मी ते जरुर केले असते. आता या वयात ते कसे शक्य आहे ?‘ असे मानून, चालून आलेल्या संधीला तो दुरुनच राम राम करतो. अशा माणसाला कोणत्याही कामाच्या किवा जबाबदारीच्या बाबतीत स्वत:चे वय कधीच अनुकूल वाटत नाही. आणि त्याकरीता तो कधी प्रयत्नही करीत नाही. मग, पोहण्यात नाही तर आडात कुठून येणार ? जिथे प्रयत्नच नसतो तिथे सफलतेची अपेक्षा कधी करता येणार ?


पण काम म्हणजे काम ! वय कधी त्याच्या आड येत नाही - असे मानणार्‍या पासून सिध्दी कधी दूर नसते. देशाचा पंतप्रधान होण्याकरीता योग्य वय कोणते ? कोणी म्हणेल, ‘पंचेचाळीस‘, दुसरा कोणी म्हणेल ‘पन्नास’, तिसरा म्हणेल ‘पंचावन्न.’ पण आपले वय कशा तर्‍हेने  गणले जाते ? पृथ्वी सूर्याभोवती जेव्हा एक फेरी मारते त्याला आपण वर्ष म्हणतो. आणि त्या फूलपट्टीने  स्वत: किती मोठे आहोत किवा किती लहान आहोत त्याचे आपण माप काढतो. पण तसे पाहिले तर पृथ्वीने सूर्याभोवती मारलेली फेरी आणि आपले लहान मोठेपण यांचा एकमेकांशी संबंधच काय ? मनुष्य जेव्हा मानतो, ‘मी या कामाला लायक आहे’ किवा ‘मी स्वत:वर ही जबाबदारी काही घेऊ शकणार नाही ?’ तेव्हा ते त्याचे काम करण्याचे खरे वय म्हणता येईल. पण हे थोडे विषयांतर झाले, मुख्य प्रश्नाचे उत्तर बाकीच राहिले. प्रश्न होता, ‘देशाचा पंतप्रधान होण्याकरीता योग्य वय कोणते ?’ ज्यांनी इग्लंडचा इतिहास वाचला आहे त्यांना माहीत आहे की, विल्यम पिट नावाच्या उमरावाने चोविसाव्या वर्षी पंतप्रधानपदाची जबाबदारी अंगावर घेतली होती. त्यांनतर दुसर्‍या पिटने तर अवघ्या बाविसाव्या वर्षी पंतप्रधानपद भूषविले होते. त्यांना जर वाटले असते, ‘एवढी मोठी जबाबदारी शिरावर घ्यायला माझे वय अजून लहान आहे‘ तर मिळालेल्या संधीचा त्यांना फायदा करुन घेता आला असता का ? इतिहासात आपले नाव झळकवता आले असता का? स्विकारलेली जबाबदारी आपण परिश्रमपूर्वक पार पाडू शकू अशी माणसात श्रध्दा असणे हेच त्याचे खरे वय. या बाबतीत अगदी दुसर्‍या टोकाचे उदाहरण घ्यायचे झाले तर ते मुरारजीभाई देसाईंचे घेता येईल. ऐंशी वर्षांच्या वयात भारताच्या पंतप्रधानकीची जबाबदारी स्विकारतांना त्यांना असे वाटले नाही, ‘मी तर अगदी म्हातारा झालो आहे.’ कोणतीही कामगिरी स्विकारतांना त्यांनी जर वयाचाच विचार केला असता तर त्या उच्चपदापर्यंत ते पोहोचू शकले नसते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)