लायकी खरी; पण मूल्य शून्य...
माझ्या परिचयातल्या एका तरुणाने एका असोसिएशनच्या सेक्रेटरीच्या जागेकरीता अर्ज केला होता. मुलाखतीला त्याला बोलावण्यात आले होते. संध्याकाळी तो घरी आल्यावर मुलाखतीसंबंधी मी त्याला विचारले. ती नोकरी मिळण्याची त्याला फार कमी आशा वाटत होती. तो म्हणाला, ‘’माझ्यापेक्षा अधिक लायकी असणारे उमेदवार त्या ठिकाणी आले होते.’’ त्यांच्यापैकी एक बी.ए. first क्लास होता. आणि एम.ए. सेकंड क्लास होता. शिवाय तो कवीही होता असे कळले. त्याच्या जवळ दोन नोटबुकेही होती. ती त्याने मला दाखविली. त्यांत त्याने रचलेल्या इंग्रजी कविता होत्या. इंग्रजी पण तो फक्कड आणि सहज बोलत होता. त्याचे इंग्रजी ज्ञान पाहिल्यावर मला वाटले की, एवढ्या लायकीच्या उमेदवारापुढे माझी डाळ शिजणार नाही.’’ हे ऐकल्यावर साहजिकच मी त्याला विचारले, ‘‘तो गृहस्थ सध्या काय करतो ते तू त्याला विचारलेस का ?’’
‘‘मला वाटते की, सध्या त्याच्याकडे काही काम नसावे. पूर्वी एकदोन वर्तमानपत्रांच्या ऑफिसमध्ये त्याने काम केल्याचे तो सांगत होता.’’
‘‘बरं, त्याचे वय काय असावे ?’’
‘‘तर मग तू नक्की समज की, त्याला ती नोकरी मिळणार नाही. तू सांगतोस त्यावरुन मला तसे खात्रीने वाटते.’’
तो परिचित तरुण माझ्याकडे पाहातच राहिला आणि म्हणाला, ‘’ तुम्हाला असे का वाटते.’’
मी म्हणालो, ‘‘त्याने अर्ज केला ती जागा रु. १९०० पगाराची आहे. ज्या माणसाला रु. १९०० पगार घ्यायची लायकी असेल तो कधी बेकार राहणार नाही. असा मनुष्य रिकामा बसून राहिल, कामाशिवाय आळसात वेळ घालवील, असे मला वाटत नाही. तो कदाचित बुध्दीमान असेल पण तो बेकार आहे त्यावरुन असे दिसते की, त्याच्यामध्ये काहीतरी उणीव आहे. साहित्यिकाचे गुण त्याच्यात आहेत, त्यामुळे साहित्यिक किवा पत्रकार म्हणून त्याने नाव काढायला हवे होते. दोन वृत्तपत्रांच्या ऑफिसमध्ये काम केल्याचे तो म्हण्तो त्यावरुन त्या क्षेत्रातही त्याच्या सफल होण्याच्या कामात काहीतरी उणीवच आड येत असली पाहिजे. चांगले लेखन करण्यार्या व्यक्ती फार थोड्या असतात. त्यामुळे अनेक ठिकाणी अशा जागेकरीता अनुकूल माणसाचा शोध सतत चालूच असतो. आणि ऐंशी-पंचाऐंशी टक्के लायक मनुष्य भेटला की, त्याची लगेच निवड केली जाते. अर्थात, त्याच्यात नक्की कोणती उणीव आहे हे त्याचा चांगला परिचय झाल्याशिवाय समजणार नाही. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, आणि ती ही की, एखादा मनुष्य बराच काळ कामधंद्याशिवाय असेल तर तोच त्याच्यात काही तरी उणीव असल्याचा पुरावा आहे. कदाचित जे काम पूर्वी त्याच्याकडे दिलेले होते ते काम त्याने उत्कट रस घेऊन केलेले नसावे; विंâवा आपण इंग्रजी कविता करु शकतो याबद्दल वाटणारा गर्वही कदाचित त्याच्या आड येत असेल.’’
त्यानंतर एक कुतूहल म्हणून त्या डबल ग्रॅज्युएटचे नांव, गाव घेऊन त्याची माहिती मिळविण्याचा मी प्रयत्न केला होता. तो मनुष्य बुध्दीमान होता हे स्पष्टच होते. त्याचा शिक्षणकालही उज्ज्वल होता. पण एखादी जबाबदारी घ्यायची त्याची तयारी नव्हती. त्यामुळे वर्तमानपत्रांच्या ऑफिसमधली त्याची नोकरी खालच्या दर्जाची नोकरी करणाच्या आड येत होती. त्याने लग्न केले नव्हते. कारण त्याला वाटे सगळीच लग्ने सफल होत नाहीत. कदाचित, लग्नानंतर पडणारी जबाबदारी अंगावर घेण्याची त्याची तयारी नव्हती असेही असेल. स्वत:च्या नकारात्मक विचारसारणीमुळे स्वत:च्या बुध्दीचा व्यवहारात तो उपयोग करु शकत नव्हता. कॉलेज सोडल्यानंतर पंधरा - सोळा वर्षांच्या काळात आपल्या कामात यश कसे मिळवायचे त्या दिशेने स्वत:च्या बुध्दीच्या उपयोग करण्याऐवजी आपल्याला अपयश का येते त्याची खोटी कारणे शोधण्यातच त्याचा बराचसा वेळा गेला. त्या माणसात शक्तीही होती, पण त्या शक्तीचा योग्य उपयोग कसा करता येईल त्याविषयीची त्याला समज आणि दृष्टी असती तर तो अपयशी ठरला नसता. सफलता मिळविण्याकरीता लागणारी बुध्दी त्याच्याकडे होती पण तिचा योग्य उपयोग करण्याची विचारशक्ती त्याच्याकडे नव्हती. आपल्या आसपासच्या वातावरणाच्या संदर्भाशी इंग्रजी कविता करण्याच्या आपल्या क्षमतेचा त्याला मेळ बसविता न आल्याकारणाने त्या दिशेनेही त्याची प्रगती खुंटली असल्याची शक्यता होती. दुसरीही काही कारणे असतील अशी माझी अटकळ आहे.
१) प्राप्त परिस्थितीतील गोष्टीपेक्षा आपण वरच्या दर्जाचे आहोत अशीही त्याची (गैर) समजूत असेल.
२) आपण निवडलेल्या क्षेत्रात काही नविन शिकण्याचा त्याच्यात अभाव असेल. त्यामुळे त्याला वाटले असेल, ‘मला जे येते ते इतरांना थोडेच येते? मग त्यांच्याकडून मी शिकणार काय ?’
३) स्वत:च्या कामात रस घेण्याचे तो शिकला नसेल. त्याला वाटले असेल, ‘मराठी समाचार तयार करण्याचे काम खालच्या दर्जाचे आहे. त्यात कसले एवढे लक्ष घालायचे?’
या कारणांमुळे ती व्यक्ती दुसर्या कोणाच्या आदरास पात्र ठरु शकली नसावी. त्याच्यातील सगळ हुशारी फुकट केली. त्याच्या नकारात्मक दृष्टिकोनामुळे त्याच्यातल्या हुशारीला जे मोकळे मैदान मिळायला हवे होते त्यावर काटेरी झुडपे विखुरली गेली होती. सफलतेचे साधे सिध्दांत समजण्याची त्याची क्षमता त्याच्या इंग्रजी कविता करण्याच्या हुशारीने जणू काही गिळून टाकली होती.