चुकांविषयी योग्य दृष्टिकोन
कोणीच मनुष्य पूर्ण नसतो. प्रत्येकात काहीना काही अपूर्णता असतेच. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. मनुष्य जर प्रत्येक बाबतीत पूर्ण असेल तर त्याला ईश्वरच म्हणावे लागेल. असंख्य मनुष्यातले तुम्हीही एक मनुष्य आहात. 'मनुष्याच्या हातून चूक ही होणारच' ही म्हण दुसऱ्यांना जितकी लागू पडते तितकी ती तुम्हांलाही लागू पडते. म्हणून आपल्या हातून कदाचित चूक होईल' अशा शंकेने भिऊन जाऊ नका. प्रत्येक महत्त्वाकांक्षी मनुष्याचे जीवन 'चूक आणि प्रयप्त्न' (trial and error) यांनी भरलेले असते. इतर मनुष्याप्रमाणे तोही चुका करतो, पण चुकांकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन इतर सामान्य मनुष्यांपेक्षा निराळा असतो. त्याच्या सफल जीवनाला तोच कारणीभूत असतो. स्वतःची चूक तो मान्य करतो, पण तिच्यातून काहीतरी शिकून घेण्याची त्याची वृत्ती असते. त्यामुळे अशी व्यक्ती तीच ती चूक पुनः कधी करीत नाही, आणि लांबच्या काळात सर्वांत कमी चुका करते. एका विद्यार्थ्याची गोष्ट मला आठवते. शिकण्यात तो अगदीच थंड. आपले धडे तो मन लावून कधीच करीत नसे. त्यामुळे एका शिक्षकाचा त्याच्यावर सदा राग असे. या वर्षी त्याने परीक्षा दिली, पण तिच्यात तो नापास झाला. त्याचे सांत्वन करतांना त्याचाच एक मित्र त्यालाम्हणाला, "नक्कीच जोशी मास्तरांनी (जे त्याचा राग करीत, त्यांनी) तुझ्यावर डूख धरून तुला नापास केले. "हा बहाणा आणि के कारण त्या विद्यार्थ्याला खूप आवडले. मनात मात्र तो समजत होता, "मी संबंध वर्षात नीट अभ्यास केलाच नव्हता, मग मी पास कसा होणार?" पण दुसऱ्यांच्या सामेर आपली चूक कबूल करणे त्याला आवडणार नव्हते, हे समजण्यासारखेआहे. त्यामुळे कोणासमक्ष त्याच्या नापास होण्याची गोष्ट निघाली की, तो लगेच म्हणे, " त्याजोशी मास्तरांच्या माझ्यावर राग होता, त्यामुळे माझ्यावर डूख धरुन त्यांनी मला नापास केले." आपली चूक लपविण्याकरीता हे तो वारंवार सांगे.त्याचा परिणाम काय झाला? जी गोष्ट खोटी आणि वाह्यात आहे असे तो सुरुवातीला मानत होता, तीच गोष्ट (वरचेवर डोक्यातआणून) तो आता खरीच आहे असे मानू लागला होता तीन ठग, कोकरु आणि ब्राम्हण यांच्यागोष्टीप्रमाणे एखादी गोष्ट मनात धरून तिच्यावर पुनःपुन्हा विचार करीत राहिले की तिचे पोषण होते. जी गोष्ट अस्तित्वातच नसते ती सत्य रुप असल्याचे मानले जाते. नंतर मनुष्य सत्य काय (जे सुरुवातीला त्याला बरोबर माहीत असते) ते पूर्णपणे विसरून जातो. माझ्यावर खार खाऊन जोशी मास्तरांनी मला नापास केले' ही गोष्ट खरी मानून त्या विद्यार्थ्याने आपली शाळाही बदलली. पुढे त्याचे काय झाले ते मला माहीत नाही. पण चांगला अभ्यास न केल्यामुळे आपण नापास झालो हा स्वतःचा दोष जर त्याने नीट समजून घेतला असता, तर त्यातून तो काहीतरी शिकला असता आणि पुढे चांगला अभ्यास करण्याकडे वळला असता. पण आपल्या शिक्षकांवरच दोष टाकण्याची वृत्ती तो जर बाळगून असेल तर मला नाही वाटत की पुढच्या वर्षीही तो वरच्या वर्गात गेला असेल. कित्येक लोकांना आपल्या चुकीची शरम वाटते. ती मान्य करण्याचीही त्यांची तयारी नसते. ही वृत्ती घातक असते. ज्यांना आपण महापुरुष समजतो अशा माणसांच्या हातूनही चुका होतात. इतिहासात पाहिले तर अनेक राज्यकर्त्यांच्या हातून निरनिराळ्या चुका झाल्या असल्याचे आढळते. राज्याची धुरा ज्यांच्या डोक्यावर असते ती काही सामान्य माणसे नसतात. नाहीतर त्यांना एवढी मोठी जबाबदारी फार काळच काय, पण एक आठवडाभरही घेता आली नसती. तरी पण त्यांच्या हातून कधी कधी चुकीचे निर्णय घेतले जातात, आणि त्या निर्णयांमुळे त्यांना स्वतःला आणि इतरांना पुष्कळ काही सहन करावे लागते. पण म्हणून निर्णय घ्यायला ते कचरतात असे कधी होत नाही. चूक होईल या भीतीने काहीच न करण्याची वृत्ती बाळगणारे, खरे म्हटले तर, श्वासोच्छ्वास करणारे जिवंत मुडदेच असतात असे म्हटले तर त्यांत अतिशयोक्ती होणार नाही.