'कधी निष्फलता अनुभवाला येईल, पण ती काही खरोखरीची निष्फलता नव्हे.'
काही वर्षांपूर्वी मी एका सर्कसमध्ये एक खेळ पाहिला होता. एका उभ्या खांबावर जोडलेल्या एका चाकावर सात-आठ फूट व्यासाची एक मजबूत फळी होती. तिला थोडा धक्का मारल्यावर चाकावर ती गोलाकार फिरे. त्या फळीवर विशिष्ट ठिकाणी लाकडाचे लहान लहान तुकडे जोडलेले होते. त्यापैकी एका तुकड्यावर कोणीही व्यक्ती दोन पाय टेकून उभी राहू शके. उभी राहिलेली व्यक्ती त्या लाकडाच्या तुकड्यावर स्थिर राहावी म्हणून डाव्या उजव्या बाजूला दीड-दोन फूट अंतरावर एक एक फळी जोडलेली होती. त्यामुळे ती वर्तुळाकार फळी जरी गोल गोल फिरली तरी मधे उभी राहिलेली व्यक्ती पडण्याची भीती नव्हती. त्या वर्तुळाकार फळीवर बांधलेल्या स्थितीत एक मुलगी उभी राहिली. त्यानंतर ती फळी खूप जोराने वर्तुळाकार फिरविण्यात आली. वीसएक फूट लांब अंतरावर एक नेमबाज उभा राहिला आणि एकामागून एक अशा पिस्तुलाच्या गोळ्या त्या फळ्यांच्या दिशेने सोडू लागला. गोळ्या तो अशा रीतीने सोडत होता की, त्यातली एकही गोळी त्या फळ्यांमध्ये उभ्या राहिलेल्या मुलीला लागत नव्हती. गोळ्या मुलीला लागत नव्हत्या, गोळ्या त्या मुलीच्या आसपास फळ्यांच्या खालच्या भागाला लागत. ती गोलाकार फळी पाचएक मिनिटे गरगर फिरली असेल आणि त्या दरम्यान त्या नेमबाजाने वीसएक गोळ्या झाडल्या असतील. गोळ्या सुटतांना पाहाणारांचा जीव टांगला जाई. एका जरी गोळीचा नेम चुकला असता तरी ती मुलगी रक्तबंबाळ झाली असती. पण पाचएक मिनिटे ती फळी वर्तुळाकार फिरल्यावर थांबली आणि ती मुलगी सहीसलामत फळीवरुन खाली उतरली. इतकी अचूक नेमबाजी त्या नेमबाजाला कशी शक्य झाली असेल? त्याकरीता त्याला किती साधना करावी लागली असेल? आपल्या पहिल्याच प्रयत्नात तो यशस्वी झाला असेल का? शक्यच नाही. पिस्तुलातील गोळ्यांची निशाणाबाजी इतकी सरळ असती तर तो खेळ तुम्ही किंवा मी सुध्दा करु शकलो असतो. शिवाय ते पाहण्यात कोणालाही रस वाटला नसता. अनेक वेळा निष्फळ झाल्यानंतरच ती अचूक नेमबाजी त्याला साध्य झाली असेल, हे अगदी सामान्य बुध्दीचा माणूसही सांगू शकेल. या खेळाचा अभ्यास करतांना सुरुवातीला कित्येक नेम पण चुकले असतील. पण त्या चुकलेल्या प्रत्येक नेमाच्या वेळी आपली चूक कुठे झाली? काय करायला पाहिजे होते? ते तो सतत शिकत राहिला असला पाहिजे. तसे त्याने केले नसते तर इतकी अचूक निशाणाबाजी करण्याची सिध्दी तो मिळवू शकला नसता.